पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून (दि.१४) स्वीकारले जाणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत विहित कालावधीत अर्ज भरावेत,असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.
राज्य मंडळातर्फे नियमित,पुनर्परिक्षार्थी,नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणा-या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी येत्या १४ जून ते २४ जून या कालावधीत नियमित शुल्कासह तर विलंब शुल्कासह २५ जून ते २७ जून या कालावधीत परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरावेत. श्रेणी सुधार करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०१९ व मार्च २०२० अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील,याची नोंद घ्यावी. नियमित शुल्काने परीक्षा अर्ज भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.