Skip to content Skip to footer

उन्हाळ्यातही ” स्वाइन फ्लू ” चा मुक्काम; सहा महिन्यात १६४२ रूग्णांना लागण

स्वाइन फ्लू साठी हिवाळा किंवा पावसाळ्याचे वातावरणच पोषक असते हा समज स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी खोटा ठरला असून, यंदाच्या वर्षी उन्हाळ्यातही स्वाइन फ्लू तळ ठोकून असल्याचे दिसले. 1 जानेवारी ते 11 जून पर्यंत राज्यात 1642 रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि त्यातील १९५ जणांचा मृत्यू झाला.

स्वाइन फ्लूचा संभाव्य फैलाव लक्षात घेऊन जोखमीच्या गटातील गरोदर महिला, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रूग्ण आणि डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, राज्याच्या आरोग्य विभागाकडून यावर्षी आत्तापर्यंत जोखमीच्या गटातील वीस हजार जणांना लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ’लोकमत’ला दिली.यंदा थंडी संपल्यानंतर राज्यातील वातावरणात अनेक चढ उतार पाहायला मिळाले. त्यामुळे स्वाइन फ्लू साठी पोषक वातावरण पुन्हा तयार झाले. परिणामस्वरूप स्वाइन फ्लू बाधित रूग्ण कायम राहिले.

उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर ही संख्या आटोक्यात आली असली तरी शून्यापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे 1 जानेवारी ते 25 मे पर्यंत 1592 रूग्णांना स्वाइन फ्लू झाला. त्यापैकी 177 जणांचा मृत्यू झाला. मात्र 15 दिवसातच 50 रूग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे दिसले. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे.  जानेवारी महिन्यात 117 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली, त्यातील 26 रुग्ण दगावले. फेब्रुवारी महिन्यात 401 नवीन रुग्ण आढळले,त्यातील 49 रुग्णांचा मृत्यू झाला. मार्च महिन्यात पाचशे पंच्याऐंशी रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली, त्यातील 63  रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात 328 पैकी पस्तीस तर मे महिन्यात 188 पैकी 24 रुग्ण स्वाइन फ्लूने दगावले.
      स्वाइन फ्लूचा संभाव्य फैलाव लक्षात घेऊन आठ ते नऊ वर्षात जे मृत्यू झाले. त्यातील काही अती जोखमीचे गट आम्ही शोधले आहेत. त्यांना आपण शासनामार्फत ऐच्छिक आणि मोफत लस दिली जाते.ही लसीकरण मोहीम 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. यावर्षी 1 लाख 27 हजार जोखमीचे रुग्ण आणि आरोग्य कर्मचाºयांना लसीकरण केले. या वर्षीही 1 लाख 19 हजार लस मागविली आहे.त्यातील 20 हजार जणांना लस देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.      स्वाइन फ्लूसह इतर संसर्गजन्य आजारासाठी राज्याचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. सरकारी डॉक्टर आणि कर्मचा-यांना कशा प्रकारे उपचार करावेत, नियमावली यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वाइन फ्लू पसरू नये यासाठी लोकांनी काय करावे काय करू नये? याबाबत जनजागृती करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a comment

0.0/5