Skip to content Skip to footer

हॅलो… तातडीने रक्त हवे….निगेटिव्ह रक्त गटाची पॉझिटिव्ह कहाणी

निगेटिव्ह रक्त हवे म्हटले की लांब-लांबपर्यंत शोध घेण्याची नामुष्की ओढावते. वेळेवर रक्त न मिळाल्याने अनेकांचा जीवही धोक्यात येतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी रक्तपेढ्यांनी निगेटिव्ह रक्तगट असलेल्या दात्यांची यादीच तयार केली आहे. दात्यांच्या मोबाईल क्रमांकासह ही यादी कायम मदतीसाठी सज्ज ठेवली जाते. एखाद्याला तातडीने निगेटिव्ह रक्तगटाची गरज असल्याचे समजताच यादीतील दात्यांशी संपर्क साधला जातो. अशा वेळी बहुतांश जण मदतीसाठी लगेच रक्तदानासाठी हजर होतात. त्यामुळे निगेटिव्ह रक्त मिळाले नाही आणि त्यामुळे एखाद्याच्या जिवावर बेतले, असा प्रसंग शहरात ओढावत नाही.

विशेष म्हणजे ‘ओ’ निगेटिव्हचे रक्तदाते शंभरात दोन ते तीन आढळतात. त्यामुळे या रक्तगटाच्या दात्यांना अतिदुर्मिळ रक्तगट म्हणून ओळखले जाते. जिल्हाभरातून ‘ओ’ निगेटिव्हचे दाते रक्तदानासाठी येतात. त्यांना रक्तगटाची जाणीव आहे. आपल्या एक वेळच्या रक्तदानाने गरजू रुग्णाला नवीन आयुष्य मिळेल, यापेक्षा मोठे समाधान नसते, असे दात्यांनी म्हटले.

विभागीय रक्तपेढीतील निगेटिव्ह दाते
रक्तगट    संख्या
‘ओ’ निगेटिव्ह    १०३
‘ए’ निगेटिव्ह    ७४
‘बी’ निगेटिव्ह    १०३
‘एबी’ निगेटिव्ह    २३

मदतीसाठी रक्तदान
मी दहा ते बारा वेळेस रक्तदान केलेले आहे. वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करण्यास प्राधान्य देतो. ‘ओ’ निगेटिव्ह रक्तगट असलेले दोन ते तीन मित्र आहेत. कधी कुणाला रक्ताची गरज भासल्याचा फोन आला तर रक्तदान करण्यासाठी जातो. – भानुदास जैवळ, ‘ओ’ निगेटिव्ह रक्तगटदाता

कधी मोजलेच नाही
किती वेळा रक्तदान केले हे कधी मोजलेच नाही. फक्त रक्ताची गरज आहे, असे कळले की, रक्तदानासाठी धाव घेतो. शिवाय शिबिरांमध्ये रक्तदान करतो. वर्षातून किमान तीन वेळा तरी रक्तदान करतो.
– संतोष माने, ‘ओ’ निगेटिव्ह रक्तदाता

रक्तदान ही एक सेवा
रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो, हा लोकांमध्ये गैरसमज आहे. रक्तदान ही एक प्रकारे समाजाची सेवा आहे. ही सेवा स्वीकारली जाते, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे अनिल लुनिया म्हणाले. रसिला लुनिया म्हणाल्या की, मी विवाहानंतर पहिल्यांदाच रक्तदान केले. नियमितपणे रक्तदान करताना मिळणारे समाधान हे अधिक मोठे वाटते.

एका दात्यामुळे 3 रुग्णांना जीवदान
प्रत्येक निरोगी माणसाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. गरजेपेक्षा ५०० मि.लि. जास्तीचे रक्त यकृत आणि पाणथरीमध्ये साठविलेले असते. रक्तदानाच्या वेळी ३५० मि.लि. रक्त घेतले जाते. ते रक्त ४८ तासांत भरून निघते. लालरक्तपेशी, प्लेटलेट, रक्तातील द्रव भाग आदी वेगवेगळे केले जातात. त्यामुळे एका रक्तदात्यामुळे किमान तीन रुग्णांना फायदा होतो.
‘नॅट’ सुविधेची प्रतीक्षाच
दरवर्षी १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळण्यात येतो. यावर्षी ‘सुरक्षित रक्त सर्वांसाठी’ ही या दिनाची संकल्पना आहे. रुग्णांना अधिकाधिक सुरक्षित रक्त आणि रक्तघटक मिळावेत, यासाठी घाटीच्या विभागीय रक्तपेढीमध्ये ‘नॅट’ची सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, हा प्रस्ताव अजूनही धूळखात पडून आहे.
वेगवेगळ्या रकमेची वसुली
रुग्णाला निकोप रक्तपुरवठा करणे हे शासकीय आणि खाजगी रक्तपेढीचे कर्तव्य आहे. विविध चाचण्या केल्यानंतरच ते रक्त रुग्णाला उपलब्ध करून दिले. मात्र, रक्ताच्या चाचण्यांसाठी विविध पद्धती, आधुनिक यंत्रांचा वापर करण्याची वेळ येत आहे. त्याचा परिणाम रक्ताच्या किमतीवर होत आहे. अत्यावश्यक प्रसंगी काही रक्तपेढ्या भरमसाठ आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी रक्कम वसूल करीत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. रक्त संक्रमण परिषदेकडे याकडे लक्ष देऊन एकसमान किंमत आकारण्यासंदर्भात कडक पाऊल उचलण्याचीही मागणी होत आहे.

Leave a comment

0.0/5