कोलकाताः पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. तत्पूर्वी गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत डॉक्टरांनी कामावर परतावे, असे निर्देश ममता बॅनर्जी यांनी दिले होते. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यातच या डॉक्टरांना भारतीय चिकित्सा संघा(आयएमए)ची साथ मिळाली आहे.
आयएमएनंही आज अखिल भारतीय विरोध दिवस घोषित केला आहे. तसेच कोलकात्याचे महापौर फरहाद हकीम यांची मुलगी सबाह हकीम हिने ममता सरकारवरच हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जींकडून करण्यात येत असलेल्या कारवाईचा तिने निषेध नोंदवला आहे. डॉक्टरांनीसुद्धा शांततामयरीत्या विरोध प्रदर्शन केलं पाहिजे, असं आवाहन तिने केलं आहे.
फेसबुक पोस्टवर ती लिहिते, गुंड अद्यापही रुग्णालयाच्या बाहेर काय करत आहेत, डॉक्टरांना मारहाण का करत आहेत. एक टीएमसी समर्थक असल्यानं नेत्यांनी मूग गिळून गप्प बसण्याच्या घेतलेल्या भूमिकेची लाज वाटते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या त्या रुग्णांचा काय दोष आहे. रुग्णांनी सरकारचा यासंदर्भात प्रश्न विचारला पाहिजे. सरकारी रुग्णालयात तैनात पोलीस अधिकारी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी काहीही केलेलं नाही. जेव्हा गुंडांनी भरलेले ट्रक समोर दिसले, तेव्हा त्यांच्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही. आम्हाला शांतीपूर्णरीत्या विरोध करण्याचा अधिकार आहे.