मुंबई – अवघ्या तीन मिनिटात गाडी चोरणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ९ च्या पोलिसांनी अटक केली आहे. यशवंत शिगवण (६०) असं या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर १८ गुन्ह्यांची नोंद असून गुन्हे शाखेकडील ४ गुन्ह्यात पोलिसांना तो पाहिजे होता.
वांद्रेच्या खारदांडा परिसरात राहणारा शिगवण उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या गाड्या अवघ्या तीन मिनिटात चोरायचा. या चोरीच्या गाड्या तो यूपी, बिहार मधील टोळीच्या हवाली करून बक्कळ पैसे कमवायचा. मेकॅनिकचं काम करणाऱ्या शिगवणने पैशांच्या अडचणीमुळे चोरीचा मार्ग पत्करल्याचे सांगितलं. अवघ्या तीन मिनिटात कारची बनावट चावी बनवून तो गाड्या चोरायचा. गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पोलिसांच्या रडारवर शिगवण होता.
त्याच्यावर १९९२ पासून एकूण १८ गुन्ह्यांची नोंद आहे. यातील १४ गुन्ह्यात शिगवण हा शिक्षा भोगून बाहेर आला होता. मात्र, शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याने चोरी करणं काही थांबवलं नव्हतं. वांद्रे परिसरातील ४ महागड्या गाडी चोरीमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मुंबईतून चोरण्यात येणाऱ्या कार शिगवण हा गुजरात, राजस्थान, नोएडा, केरळा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, बिहार, कोलकाता, झारखंड, ओडिशा, आसाम व नेपाळमध्येही विकायचा. कार चोरी बाजारात तवेरा, स्कॉर्पिओ, बोलोरे, क्वालिस, पजेरो, मारुती, सँट्रो आदी गाड्यांना अधिक मागणी आहे