पंढरपूर नउटी: श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेची चंद पूजा ६ एप्रिल ते १२ जून या कालावधीत पार पडली. दरम्यान, विठ्ठलाकडे १३८ तर रुक्मिणीमातेकडे २४ भाविकांनी या पूजेसाठी सहभाग नोंदविला. या पूजेतून मंदिरे समितीला एकूण २५ लाख ६२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले़ गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ लाख ७५ हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
उष्णतेची दाहकता वाढत असून, ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून म्हणजेच ६ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला होता़ १२ जून रोजी त्याची सांगता झाली. दरम्यानच्या काळात मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी चंदनउटीची ही पूजा उपलब्ध करुन देण्यात आली होती.
श्री विठ्ठलाकडील पूजेसाठी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेकडील पूजेसाठी ११ हजार रुपये इतके देणगीशुल्क निश्चित केले होते़ गतवर्षीच्या तुलनेत श्री विठ्ठलाकडे सहा तर रुक्मिणीमातेकडे साडेतीन हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली होती़ यामुळेच मंदिरे समितीच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येते, असे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले़ पूजा आणि देणग्यातून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.