‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला.
सभात्याग करण्यापूर्वी त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची सभागृहातच पुष्पहार घालून तसेच हळद-कुंकू लावून पूजा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.
बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विकासकामांकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा विषय उपस्थित केला. त्यावर विरोधी सदस्यांनी सभेत गोंधळ घातला.
स्थायी समितीने ज्या कामांसाठी निधीची तरतूद केली होती, अशी अनेक कामे अंदाजपत्रकाच्या पुस्तकात दिसत नाहीत. मग हा निधी कोठे गेला, कोणत्या कामांकरिता धरण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली.
सत्ता तुमची आहे म्हणून काहीही करता का? कोणाला विचारून हे बदल केले ? असे सवाल करीत अंदापत्रकातील फेरबदल आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कदम यांनी सभेत दिला. आमच्या आघाडीच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार कदम यांनी यावेळी केली.