भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेत आता शिवसेनाच भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे. महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनाही महापौरांचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केला आहे.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त उपनेते राठोड यांनी बुधवारी पत्रकारांना पक्षकार्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. पदाधिकारी, नगरसेवकांना दर पाच वर्षाला निवडणुकीची परीक्षा द्यावी लागते. मात्र गेल्या ५० वर्षांपासून तेच अधिकारी महापालिकेत काम करीत आहेत.
विकास कामांबाबत आंदोलने करणाºया, माहितीच्या अधिकारात माहिती मागविणाºया राजकीय कार्यकर्ते, नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी करीत आहेत. त्यांनी केलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळे आणि इतरांच्या दबावाखाली अधिकारी पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल करीत आहेत.
राजकीय नेत्यांकडून दमदाटी होत असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. केवळ शिवसेनेच्या विरोधात तक्रार करण्याचे काम महापालिकेतील अभियंते करीत आहेत. आयुक्तांवर धूर फवारणी करणाऱ्यांवर तसेच इतर पक्षाच्या विरोधात तक्रारी दाखल करण्याचे धाडस अभियंते दाखवित नाहीत. शहरात उच्चशिक्षित अभियंते बेकार आहेत, मात्र महापालिकेत तांत्रिक जागा भरल्या जात नाहीत. काही अभियंते कमरेला बंदूक लावून काम करीत आहेत. त्यामुळे कोणाची दहशत आहे, हे सांगण्याची गरज नाही, असा सवाल राठोड यांच्यासह शहर प्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांनी केला.जे स्वच्छ आणि परदर्शकपणे काम करतात त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलायला भिती वाटत नाही. भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे अभियान फक्त शिवसेनाच राबवू शकते. अभियंत्यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती आल्यानंतर सविस्तरपणे माध्यमांना सांगितले जाईल, असे राठोड म्हणाले.
बल्लाळ पुन्हा नगररचना विभागात
महापौर बाबासाहेब वाकळे हेच सध्या नगररचना विभाग चालवित आहेत. एका राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सांगण्यानुसार महापौरांनी त्यांच्या आदेशाने बल्लाळ यांनी नगररचना विभागात बदली केली.