नागपूर : आईच्या दुधापासून वंचित राहिलेल्या बाळाला वरचे म्हणून गाई-म्हशीचे दूध नाहीतर पावडरचे दिले जाते. मात्र अशा दुधांमध्ये संरक्षक द्रव्य नसतात. बाळाच्या आरोग्यासाठी लागणारी पोषणद्रव्येही फारच अल्प प्रमाणात असतात. अशा वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांना जंतुसंसर्ग होतो. बाळ वारंवार आजारी पडते. अशा बाळांसाठी ‘ह्यूमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दोन वर्षांपूर्वी हा प्रस्ताव तयार केला होता. परंतु जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला. अखेर मेडिकलने या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला असून अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी जागेची पाहणी केली, सोबतच नव्याने प्रस्ताव पाठविण्याचा सूचना संबंधितांना दिल्या.
माता म्हटले की प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, आपुलकी हे सर्व शब्द थिटे पडतात. परंतु काही (कु)माता जन्माला येणाºया बाळाचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात. अमृतासमान असलेलं आईच्या दुधापासून नवजात अर्भक वंचित राहतात. अनथालय आईच्या दुधाची तहान दुधाची पावडर, बाटली किंवा बालान्नाने (बेबी फूड) भागवितात. यामुळे अशा मुलांचा बौद्धिक विकास आणि शारीरिक वाढ मंदावते. यावर उपाय म्हणून ‘मातृ दुग्ध पेढी’ची मागणी अनाथालयांकडून होत आहे. शासकीय रुग्णालयात याची सोय झाल्यास याचा फायदा अनाथालयांनाच नाही तर अनेक कारणांमुळे ज्या आईंना दूध पाजता येत नाही त्यांनाही होण्याची शक्यता आहे.
मानवी दुग्ध पेढीची गरज लक्षात घेऊन मेयोच्या बालरोग विभागाच्या तत्कालीन विभाग प्रमुख डॉ. दीप्ती जैन यांनी रोटरीच्या मदतीने मानवी दुग्ध पेढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. जिल्हा विकास नियोजन समितीने मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात ही पेढी व्हावी म्हणून प्रत्येकी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. परंतु मेयोने या प्रकल्पासाठी जागा नसल्याचे सांगून हात वर केले. मेडिकलने सुरुवातीला उदासीनता दाखवली. परंतु अधिष्ठाता डॉ. मित्रा यांच्याकडे प्रस्ताव येताच गेल्या चार दिवसांपासून जागा पाहणे, नवीन प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी बैठकही घेतली. यामुळे येत्या काळात मेडिकलमध्ये मानवी दुग्ध पेढी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.