नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७१७ स्कूल बस व व्हॅन फेरतपासणीसाठी हजर झाल्या. उर्वरित ३०९ स्कूल बसेस तपासणीला आल्याच नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूल बसची फिटनेस चाचणी घेण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, ज्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र वैध आहे, त्यांनासुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्कूल बस फेरचाचणीकरिता सादर करणे बंधनकारक केले. फेरतपासणीत वाहनात दोष आढळून आल्यास दोषाचे निराकरण केल्यानंतर वाहन तपासणीसाठी पुन्हा सादर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. फेरचाचणीचा कालावधी ३ मे ते ६ जूनपर्यंत होता. परंतु नंतर तो १६ जूनपर्यंत वाढविण्यात आला.