सेनगाव (हिंगोली ) : येथील पंचायत समिती कार्यालयात बीडीओसह सर्वच विभागाचे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने कारभार ठेपाळला आहे. कार्यालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीने बुधवारी (दि. १९ ) बीडीओच्या खुर्चीवर वराहाचे पिल्लू बसवून आंदोलन करण्यात आले.येथील पंचायत समितीच्या कारभाराकडे जिल्हा परिषदेचे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना कोणताही धाक उरला नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने कामकाज सुरु आहे. \या प्रकारामुळे पंचायत समिती इमारतीची मोठ्या प्रमाणात दैना झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या कारभारा विरोधात शिवसेनेच्या वतीने रोष व्यक्त करुन बुधवारी गैरहजर बीडीओसह अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा टेबलवर वराह बसवून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, पं.स. सदस्य सुनील मुंदडा, बद्रीनाथ कोटकर, अनिल अगस्ती यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.