Skip to content Skip to footer

मॉरिशसला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला आणि या डॉक्टरने केली ‘अशी’ कृती (व्हिडीओ)

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे नुसते नाव जरी घेतले तरी मराठी माणसाच्या रक्तात उत्साह आणि अभिमान सळसळतो. महाराजांना वंदनीय मानणाऱ्या व्यक्ती फक्त महाराष्ट्रातच नाही सर्वदूर आणि सातीसमुद्राच्या पलीकडेही आहेत. भारताच्या व्यतिरिक्त बाहेरील देशातही त्यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. अशीच घटना मॉरिशस येथे घडली आहे. पर्यटनासाठी गेलेले डॉ प्रवीणकुमार पानसरे यांना महाराजांचा पुतळा दिसल्यावर त्यांनी तो साफ करून हार अर्पण केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकमतने डॉ पानसरे यांच्याकडे त्याची खात्रीही केली आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ पानसरे हे नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे जनरल सर्जन म्हणून प्रॅक्टिस करतात. जूनमध्ये ते त्यांची पत्नी डॉ दीपाली आणि तीन मुलांसोबत मॉरिशस येथे फिरायला गेले होते. तिथे कॅसेला प्राणिसंग्रहालय आणि पक्षी अभयारण्य फिरून झाल्यावर बाहेर त्यांना अचानक गाडीतून शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला. मात्र पुतळा महाराजांचा आहे की नाही याची खात्री होईपर्यंत गाडी बरीच पुढे गेली होती. येताना मात्र त्यांनी ड्रॉयव्हरला त्या पॉइंटवर गाडी थांबवण्याची सूचना केली.

 

गाडी थांबल्यावर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा पुतळा दिसल्यावर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मात्र पुतळ्यावर धूळ आणि जळमटे बघितल्यावर त्यांनी त्वरित तो साफ करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने जवळ असलेल्या स्वच्छ पाण्याच्या ओढ्यातून त्यांनी बाटलीने पाणी आणून पुतळ्याला अभिषेक केला आणि जवळ असलेला फुलांचा हार घातला. यावेळी त्यांनी महाराजांचा विजय असो अशा घोषणाही दिल्या. त्यांचा हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. याबाबत डॉ पानसरे म्हणाले की. ‘मुळातच प्रसिद्धीसाठी यातले काहीही मी केले नाही. सातासमुद्राच्या पलीकडे असलेली महाराजांची कीर्ती बघून हृदय अभिमानाने फुलून आले. त्यावेळी पुतळा स्वच्छ करणे माझे कर्तव्य होते आणि मी ते निभावले’.

Leave a comment

0.0/5