Skip to content Skip to footer

जीवघेणी लिफ्ट : सस्पेन्स संपला! ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस खरा व्हिलन

गेल्या आठवड्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयातील एक लिफ्ट बंद पडली होती व त्यात ११ व्यक्ती अडकले होते. ती लिफ्ट त्यांच्या जीवावरच उठली होती. बॅटरी बॅकअप नसल्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही असे आतापर्यंत बोलले जात होते, परंतु तो अंदाज खोटा ठरला आहे. या घटनेमागे कोण हा सस्पेन्स संपला असून ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस हा खरा व्हिलन होता, हे स्पष्ट झाले आहे.घटनेनंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून संबंधित लिफ्टची बॅटरी खराब झाली असून ती बदलविण्यात यावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार, विभागाच्या सेक्शन इंजिनियरने बॅटरीची तपासणी केली असता तिच्यात काहीच बिघाड आढळून आला नाही. ती बॅटरी गेल्या मार्चमध्येच बसविण्यात आली होती. त्यानंतर अन्य तांत्रिक उपकरणे तपासून पाहिली असता लिफ्टमधील ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाईस योग्य पद्धतीने कार्य करीत नसल्याचे आढळून आले. थायसेनक्रप कंपनीकडे संबंधित लिफ्टच्या देखभालीचे कंत्राट आहे. त्यामुळे कंपनीला नोटीस बजावून यावर स्पष्टीकरण मागण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती पुढे आली आहे.११ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली होती.

जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारापुढील एक लिफ्ट पाचव्या माळ्यावर पोहचताच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लिफ्टचे दार उघडले नाही. परिणामी, ११ व्यक्ती आत अडकले. असह्य उकाडा व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वांचा थरकाप उडाला. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या. त्यातच शाहीन शहा, आफरीन अझमत व सुधा सहारे या तीन महिला वकील एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडून खाली कोसळल्या. त्यामुळे सोबतच्या व्यक्तींनी आरडाओरड सुरू केली. परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, तंत्रज्ञांनी १० मिनिटानंतर लिफ्टचे दार उघडण्यात यश मिळवले. तेव्हापर्यंत बेशुद्ध पडलेल्या महिला वकिलांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे त्या बचावल्या होत्या.

Leave a comment

0.0/5