Skip to content Skip to footer

मॅकॅनिकल अभियंता बनला आंतराष्ट्रीय दर्जाचा योग प्रशिक्षक

लहानपणापासून सुर्यनमस्कार, योगासनांची असलेली आवड जोपासत त्यांनी ऐन तारुण्यात बड्या कंपनीमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली. देशभर फिरताना विविध योग संस्थांमध्ये प्रशिक्षण घेऊन स्वत:ला तयार केले. उमेदीच्या वयातच  ‘योग सेवा’ करायची या हेतूने त्यांनी काम सुरु केले. योग प्रशिक्षक आणि योग थेरपिस्ट अशी ओळख निर्माण झाली आणि बघता बघता आंतरराष्ट्रीय पातळीवर योगाचे प्रशिक्षण देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली.

बिबवेवाडीमधील चिंतामणीनगर (३) मध्ये राहणारे मनोज पटवर्धन असे या ‘योग वेड्या’ व्यक्तीचे नाव आहे. पटवर्धन हे मॅकॅनिकल इंजिनीअर आहेत. किर्लोस्कर कंपनीमध्ये मार्केटींग विभागात उच्च पदावर ते काम करीत होते. लहानपणापासूनच त्यांना सुर्यनमस्कार आणि योग करण्याची आवड होती. तरुणपणामध्ये ही आवड अधिकच वाढली. मार्केटींगच्या निमित्ताने देशभर त्यांचे फिरणे व्हायचे. त्यावेळी ते स्थानिक योग शिक्षण संस्थांना आवर्जून भेट देऊन तेथे प्रशिक्षण घेत असत. वयाच्या पस्तीशीमध्ये त्यांनी योग विषयाला वाहून घेण्याचे ठरविले. निवृत्तीनंतर काहीतरी करण्यापेक्षा उमेदीच्या वयामध्येच कार्य करावे असा निग्रह करुन त्यांनी ४० व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला.

पूर्णवेळ योग शिक्षण आणि प्रशिक्षण असा कार्यक्रम सुरु झाला. योगा थेरपिस्ट म्हणूनही ते काम करु लागले. शनिवार-रविवार ते काही ठिकाणी योग शिकवण्यास जाऊ लागले. यासोबतच डॉक्टर्स, सेलिब्रिटींना योगाचे प्रशिक्षण देऊ लागले. कर्करोग, पाठीच्या आजाराचे रुग्ण, मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या उपचारांमुळे फरक पडू लागला. सध्या ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये योग शिकवतात. यासोबतच केंद्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाद्वारे चालवल्या जाणाºया अभ्यासक्रमात योग शिकवतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे योगविषयक प्रोजेक्ट तपासण्याचे कामही करतात. तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या  ‘वर्ल्ड स्किल्स’ या कार्यक्रमांतर्गत युरोपामध्ये घेतल्या जाणाºया स्पर्धांमध्ये बसणाºया विद्यार्थ्यांना योग शिकविण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. पूर्ण देशभरामधून प्रथम आलेले हे विद्यार्थी जगातील विविध देशांमध्ये शिक्षणासाठी जाणार आहेत. या विद्यार्थ्यांना योग पारंगत करण्याचे काम सध्या पटवर्धन करीत आहेत.

Leave a comment

0.0/5