राज्यभरात शिवसेना नेमणार एक लाख महिला संघटक
नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना वर्धापनदिन कार्यक्रमात शिवसेनेने प्रभाग तिथे शाखाप्रमुख ही नवीन घोषणा देत राज्यभरात एक लाख शाखाप्रमुख नियुक्त करण्याची योजना असल्याचं जाहीर केलं. शिवसेनेच्या विश्वनाथ नेरुरकरांनी जमलेल्या शिवसैनिक आणि प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करत राज्यभर शिवसेनेचं जाळं पसरवण्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आदेश असल्याचं सांगितलं. त्यानुसार “माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र” ही योजना राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रभागात एक पुरुष शाखाप्रमुख व एक महिला संघटक अशा नेमणुका करण्यात येणार आहेत.
शिवसेनेत महिलांनाही पुरुष पदाधिकाऱ्यांएवढंच महत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे जितके पुरुष शाखाप्रमुख तितक्याच महिला संघटन हे सूत्र राबवण्यात येणार असून एक लाख पुरुष आणि एक लाख महिला अशा दोन लाख शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापर्यंत पूर्ण करण्याचा मानस शिवसेनेचा आहे.
एवढंच नव्हे तर या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपले फोटो शिवसेना भवनात जमा करण्याचे आदेश सुद्धा दिले गेले असून प्रत्येकाला आयकार्ड देण्याची शिवसेनेची योजना आहे. या नियुक्त्या करताना जात-पात,नातीगोती न पाहता कट्टर शिवसैनिकांनाच प्राधान्य दिलं जावं असंही नेरुरकर यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.