बेस्ट बसने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किमीसाठी केवळ ५ रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने हा नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. साध्या बससाठी पहिल्या ५ किमीला ५ रुपये तर एसी बससाठी ६ रुपये किमान तिकीट दर असेल.
या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी ६०० कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. मात्र तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश करारात आहेत. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे.