Skip to content Skip to footer

नागपुरातील वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे विभागाचे दुर्लक्ष

नागपूर : मागील काही काळापासून नागपूर शहरातील प्रदूषण वाढीस लागले असून पारादेखील तापताना दिसून येत आहे. अशा स्थितीत कर्तव्य बजावताना वाहतूक पोलिसांचा कसच लागतो. मात्र पोलीस विभागाकडून वाहतूक पोलिसांच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एकीकडे आधुनिकीकरणाचे मोठमोठे दावे करणाऱ्या विभागाकडून वाहतूक पोलिसांसाठी आवश्यक प्रमाणात ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’देखील खरेदी करण्यात आलेले नाही. अशा स्थितीत सतत ऊन, प्रदूषण यांचा सामना करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे आरोग्य जपण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. वाहतूक पोलिसांसाठी विभागातर्फे प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘मास्क’ खरेदी करण्यात आले आहेत का, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ‘जॅकेट्स’ घेतले आहेत का, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. नागपूर शहरात सद्यस्थितीत पाचशेहून अधिक वाहतूक पोलीस आहेत. मात्र वाहतूक विभागाने दिलेली माहिती आश्चर्यचकित करणारी आहे. वाहतूक विभागाने पोलिसांसाठी ना ‘मास्क’ खरेदी केले ना ‘जॅकेट्स’ घेण्यासाठी पावले उचलली.

१९ जानेवारी २०१८ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे वाहतूक विभागाला २५० ‘मास्क’ देण्यात आले होते. तर ४ मे २०१८ रोजी १०० ‘जॅकेट्स’ प्राप्त झाले होते. यांच्या भरवशावरच वाहतूक पोलीस कर्तव्य बजावत आहेत. प्राप्त झालेले ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’ यांची संख्या पर्याप्त नसतानादेखील वाहतूक विभागाने खरेदीसाठी पावले उचलली नाहीत. नागपूर शहरातील अनेक चौकांमध्ये गर्दीच्या वेळी प्रदूषण वाढलेले असते. अशा स्थितीत वाहनांमधून निघणाऱ्या धुराचा सामना करत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक विभागाला काहीच चिंता नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात झाले, नागपुरात का नाही ?
वैद्यकीय सल्ल्यानंतर वाहतूक पोलिसांसाठी पुणे वाहतूक शाखेने ‘मास्क’ व ‘जॅकेट्स’ची खरेदी केली होती. नागपुरात पुण्याहून जास्त ऊन तापते व शहरातील ‘पीएच २.५’, ‘पीएच १०’ या धुलीकणांचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. अशा स्थितीत नागपूरच्या वाहतूक पोलीस विभागाने कुठलाही पुढाकार का घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5