शिवसेनेने भरून घेतले संभाजीनगर जिल्ह्यातील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे पीक विमा तक्रार अर्ज
शेतकऱ्यांनी पीक विमा रक्कम भरून देखील पीक विमा मिळत नाही हे लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्रामीण महाराष्ट्रात गावोगावी पीक विमा मदत केंद्रे उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात शिवसेनेने पीक विमा मदत केंद्रांची उभारणी केली होती. यात संभाजीनगर जिल्हा शिवसेनेने सर्व तालुक्यात पीक विमा मदत केंद्रे सुरु केलीं आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने प्रत्येक मदत केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी या अभिनव मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३४ ठिकाणांहून ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे पीक विमा न मिळाल्याचे तक्रार अर्ज भरून घेण्यात आले. फक्त संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रार अर्ज आल्याने शेतकऱ्यांना पीक विमा न मिळण्याची समस्या गंभीर असून राज्यभरात हा आकडा लाखोंच्या घरात असण्याची शक्यता असल्याचं लक्षात येत.
दरम्यान बँका आणि विमा कंपन्या यांच्या संथ कारभार अथवा गैरकारभारामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरवून सुद्धा दुष्काळामुळे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. हाच धागा पकडून शिवसेना आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मैदानात उतरली आहे. नुकत्याच झालेल्या शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला होता.