आदित्य ठाकरे यांनी घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील उपलब्ध जागांची माहिती तातडीने जाहीर करण्यात यावी अशी मागणी काल शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन केली. अकरावी प्रवेश प्रक्रियेत अभ्यासक्रमांची जागानिहाय माहिती न दिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सरकारने तातडीने निर्देश द्यावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली.
याशिवाय दहावी आणि बारावीच्या पुनर्मूल्यांकन शुल्काबाबत सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सुधारणा सुचवली. २० पानी उत्तरपत्रिकेची प्रत मिळवण्यासाठी ४०० रुपयांऐवजी ५० रुपये तर पुनर्मूल्यांकनासाठी ३०० रुपयांऐवजी ५० रुपये शुल्क आकारले जावे आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली. राज्यातील शाळा-महाविद्यालयांतील मूलभूत सुविधांची तपासणी करून उपलब्ध नसलेल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थीनींसाठी स्वसंरक्षण कार्यशाळा घेण्यात याव्यात तसेच इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस चालवून शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी या इतर मागण्याही आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्या.