नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ‘कॅडेव्हर लॅब’

कॅडेव्हर लॅब’ | Cadre Labs at Government Medical College, Nagpur

नागपूर : शल्यचिकित्सकेचे कौशल्य विकसित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ‘कॅडेव्हर लॅब’ आवश्यक असते. या ‘लॅब’मुळे शस्त्रक्रियेतील चुका टाळता येतात. शस्त्रक्रियेत अचूकता येते. महत्त्वाचे म्हणजे, आत्मविश्वास निर्माण होतो. याच उद्देशाने मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘कॅडेव्हर लॅब’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ‘लॅब’साठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा प्रस्तावही तयार केला आहे.

देहदानाचा खरा उपयोग होतो तो वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना. भावी डॉक्टर या दान केलेल्या मृतदेहावर प्रात्यक्षिक करून शास्त्रोक्त माहिती मिळवितात. या अनुभवाच्या बळावर ते रुग्णांवर निदान, उपचार, शस्त्रक्रिया करू शकतात. विशेषत: सर्वच शल्यचिकित्सकांनी शरीररचनाशास्त्राचा अभ्यास केलेला असतो. विशेषत: एमबीबीएसचे पहिले वर्ष मृतदेहावरच (कॅडेव्हर) शिकविले जाते. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा तणाव असतो. यामुळे त्याचे महत्त्व कळत नाही. परंतु तोच विद्यार्थी पुढे जेव्हा शल्यचिकित्सक होतो, तेव्हा शरीररचनाशास्त्राचे महत्त्व त्याला कळते. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

वरिष्ठ डॉक्टरांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण घेत तो शस्त्रक्रियेत निपुण होतो. परंतु यात बराच कालावधी जातो. परंतु ‘कॅडेव्हर लॅब’मुळे हा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. शरीररचनाशास्त्र व अस्थिव्यंगोपचार विभागाच्या संयुक्त उपक्रमातून ‘लॅब’ची निर्मिती होणार आहे. यासाठी विशेष शीतगृह उभारले जाणार आहे. सुरुवातीला येथे १० वर मृतदेह ठेवण्याची सोय केली जाईल. सध्या देशात ‘केईएम’ व चेन्नई येथील रुग्णालयातच ही ‘लॅब’ आहे.

रासायनिक प्रक्रिया केलेल्या मृतदेहावर प्रशिक्षण देणे अवघड
अधिष्ठाता डॉ. मित्रा म्हणाले, देहदानानंतर रासायनिक प्रक्रिया करून ठेवले जाते. अशा मृतदेहाचे शरीर व अवयव हे कडक होऊन जातात. यामुळे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि अशा मृतदेहावरील शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण यात बरेच अंतर येते, म्हणूनच ‘कॅडेव्हर लॅब’चा निर्णय घेण्यात आला आहे. या ‘लॅब’मुळे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदाही होऊ शकतो.
मृतदेहावरील प्रात्यक्षिक अभ्यास हा वैद्यकीय कौशल्यप्राप्त करण्याचा पाया ठरतो. ‘कॅडेव्हर लॅब’मुळे हातून होणाºया चुकांची भीती दूर होऊन अचूकता येते. या ‘लॅब’ची ‘नी’, ‘हिप’, ‘जॉर्इंट रिप्लेसमेंट’च्या प्रशिक्षणासाठी मोठी मदत होईल. शस्त्रक्रियेतील कौशल्य अधिक विकसित होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here