Skip to content Skip to footer

लोणावळ्यात मॉन्सूनची जोरदार हजेरी

लोणावळा : लोणावळा शहर व परिसरात मान्सूनने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील अनेक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर भांगरवाडी येथे गुलमोहराचे झाड विजेच्या तारेवर पडले. संततधार पावसाने डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांनी पावसात भिजण्याचा तसेच धबधब्यांखाली बसण्याचा मनमुराद आनंद लुटला.

पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात पावसाने महिनाभरापासून कानाडोळा केला होता. पावसाअभावी पर्यटक नाराज होत होते. गुरुवारी सायंकाळी मान्सूनयुक्त पावसाने लोणावळा शहरात हजेरी ल‍ावली. पावसाची ही संततधार आज शुक्रवारी दिवसभर कायम राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

पावसामुळे शहरातील मावळा पुतळा चौक, र‍ायवुड येथिल ट्रायोज मॉल समोरील रस्ता, नगरपरिषद रुग्णालयासमोरील रस्ता, भांगरवाडी, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण गावातून जाणारा रस्ता तसेच मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणारा वलवण पुलाखालील रस्ता, लोणावळा धरणाच्या खालील रस्ता हे सर्व ड्रेनेज सिस्टिम अभावी पाण्याखाली गेले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथिल कर्नाळा बँकेसमोर एक गुलमोहराचे झाड कोलमडून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाल्याची वार्ता समजल्यानंतर पर्यटकांनी शहरात येण्यास गर्दी केल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. पालखी बंदोबस्ताकरिता लोणावळ्यातील अनेक पोलीस केल्याने वाहतुक कोंडी सोडविताना कर्मचार्‍यांची कमतरता प्रखरतेने जाणवत होती. सहारा पुलासमोर डोंगरातून वाहणारे धबधबे दुपारपासून वाहू लागल्याने ती पर्यटकांकरिता पर्वणी ठरली होती. या धबधब्यांमध्ये बसून भिजण्याचा पर्यटक‍ांनी मनमुराद आनंद घेतला. पावसाची संततधार दिवसभर कायम होती.

Leave a comment

0.0/5