विमानाचे उड्डाण आणि धावपट्टीवर उतरण्यास अडथळा ठरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या काही इमारतींचे अवैध माळे पाडण्यात येणार आहे. विमातळालगतच्या इमारतींचे सर्वेक्षण केल्यानंतर मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) सहा इमारतींना नोटिसा दिल्या असून, दोन ते चार माळे तोडण्यात येणार आहेत. नोटीसला उत्तर देण्यासाठी इमारतींच्या मालकांकडे २५ दिवसांचा वेळ उरला आहे.
नोटिसा दिलेल्या इमारतींपैकी काहींचे बांधकाम सुरू आहे. यामध्ये साई बिल्डकॉन-तभाने ले-आऊट, भामटी, ललित बिल्डर्स, फुलसुंघे ले-आऊट, भामटी, ग्रीन अर्थ इन्फ्रा प्रोजेक्ट्स, जीएनएसएस, भामटी, मिलिंद कालसैत, प्लॉट २७, फुलसुंघे ले-आऊट, इंद्रप्रस्थनगर, भामटी आणि महेश जांगीड, तभाने ले-आऊट, भामटी आदींचा समावेश आहे. याशिवाय जयताळ्यात पूर्वीच निर्मित रेणुका एन्क्लेव्हला नोटीस दिला आहे. तसेच विमानाच्या ये-जा करिता अडथळा ठरणारे जयताळा येथे दोन इमारतींवर लावण्यात आलेल्या दोन मोबाईल टॉवरकरिता नोटिसा जारी केल्या आहेत. तिसरा भागीदार येण्यापूर्वी विमानतळालगतच्या इमारतींच्या अवैध बांधकामासंदर्भात एमआयएलने कठोर पावले उचलली आहेत.
प्राथमिकतेच्या आधारावर विमानतळाच्या चारही बाजूला ५-५ कि़मी. दूर अंतराच्या आत निर्मित आणि निर्माणाधीन इमारतींच्या उंचीवर एमआयएलने लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळाच्या फनल एरियाच्या स्वरूपात जयताळ्याकडील आणखी १० इमारतींना नोटिसा देण्यात येणार आहे. लोकमतने वर्ष २०१८ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विमानांना अडथळा ठरणाऱ्या उंच इमारतींच्या संदर्भात वृत्त प्रकशित केले होते. ७ सप्टेंबरला ‘लॅण्डिंग करताना विमान देतात इमारतींच्या अडथळ्यांचे संकेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. हिंगणा क्षेत्रात काही इमारती चिन्हित करण्यात आल्याचे एमआयएलच्या सूत्रांनी सांगितले.
महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
अडथळा ठरणाऱ्या इमारतींसंदर्भात १९ सप्टेंबरला एएआय व एमआयएलची संयुक्त बैठक़
एरोनॉटिकल ऑब्सटिकल सर्वेक्षणाकरिता एमआयएलतर्फे नाशिक येथील कंपनीला ऑक्टोबर २०१८ मध्ये १५ लाखांचे कंत्राट.
भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे (एएआय) ‘रेणुका’ आणि ‘प्रोजोन पॉम’ची एनओसी रद्द.
काही इमारतींची उंची जास्त असल्यामुळे ३२०० मीटर लांब धावपट्टी ५६० मीटरने कमी करण्याचा एमआयएलकडे प्रस्ताव.
नियमानुसार एअरपोर्टच्या चारही बाजूला २० कि़मी.च्या टप्प्यात उंच इमारतींच्या बांधकामासाठी एएआयची एनओसी आवश्यक.
व्हीओआर सिग्नलमध्ये अडथळा ठरतेय ‘प्रोजोन पॉम’
विमानतळाच्या धावपट्टीच्या थ्रेशहोल्ड पॉर्इंटसमोर निर्मित ‘प्रोजोन पॉम’ इमारतीच्या उंचीमुळे व्हीएचएफ ओमिनी डायरेक्शन रेंज (व्हीओआर) सिग्नल व इन्स्ट्रूमेंटल लॅण्डिंग सिस्टिममध्ये समस्या येत आहे. ही सिस्टिम एएआयशी जुळली आहे. ‘प्रोजोन पॉम’च्या बिल्डरने एएआयद्वारे एनओसी रद्द केल्यानंतर नागरी उड्डयण मंत्रालयात अपील केले आहे. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे.