मुंबईत प्रचंड पाऊस: शिवसेना नगरसेवक,आमदार उतरले मैदानात
मुंबईचा पाऊस प्रचंड असतो. या पावसामुळे मुंबईत हाहाकार उडतो. मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत होतं. मुंबईत पाऊस झाल्यावर परळ-हिंदमाता विभागावर सर्वांचे लक्ष असते. मुंबईत पाऊस झाला की या भागात पाणी साचणार असं काही वर्षांपूर्वी समीकरण होतं. शुक्रवारी झालेल्या पावसाने मात्र हा परिसर पाण्यात बुडाला नाही. नेहमीच ओढवणारी परीस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून चालवले होते. मुंबईच्या पहिल्या मोठ्या पावसात तरी या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईतील पावसाचे वातावरण लक्षात घेता मुंबईच्या एफ/दक्षिण विभाग अतिदक्षता ,परीक्षण व दुरुस्ती, घनकचरा इत्यादी विभागातील अधिकारी शुक्रवारी दक्ष होते. त्यांनी हिंदमाता परिसरावर सातत्याने लक्ष ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. याबरोबरच शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २०० च्या नगरसेविका उर्मिला पांचाळ स्वतः या परिसरात पाहणीसाठी उतरलेल्या दिसल्या. हे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांनी या नगरसेविकेचं कौतुक करत त्याच्या कार्यावर समाधान व्यक्त केलं. तसेच यंदाच्या पावसात हा परिसर पूर्णपणे जलमय झाला नाही असंही अनेक नागरिकांनी सांगितलं.
दुसरीकडे वरळी विधानसभेचे शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि शाखाप्रमुख विजय भांगे यांनी भर पावसात वरळी बीडीडी चाळ परिसरात नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महापालिका आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसह फेरी मारल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड पावसामुळे समस्या निर्माण होण्याआधीच नगरसेवक आणि आमदारांना प्रशासन अधिकाऱ्यांसह भर पावसात परिसराची पाहणी करताना पाहून नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.