Skip to content Skip to footer

वाळूजमध्ये नागरिकांच्या घरात शिरले सांडपाणी

वाळूज महानगर : वाळूजमध्ये गटार नाले तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर सांडपाणी नागरी वसाहतीत साचून काही नागरिकांच्या घरात शिरले.परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्यात न आल्याने सांडपाणी रहिवाशांच्या घरात शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.ड्रेनेजलाईन टाकण्यासह गटार नाल्याची स्वच्छता करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना घेराव घातला.

वाळूज येथील अण्णा भाऊ साठेनगरात ठिकठिकाणी गटार नाल्या तुंबल्या आहेत. नाल्याची नियमितपणे साफसफाई होत नसल्यान सांडपाणी नागरी वसाहतीत साचत आहे. गुरुवारी जोरदार पाऊस झाल्यामुळे गटार नाल्याचे सांडपाणी या परिसरातील अनेकांच्या घरात शिरले. त्यामुळे अनेकांना रात्री उशिरापर्यंत घाण पाणी बाहेर काढण्याची कसरत करावी लागली.
ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे साफ-सफाई करीत नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. केर-कचरा, प्लास्टिक पिशव्या आदींमुळे गटारे भरली आहेत. विशेष म्हणजे या परिसरात ग्रामपंचायतीच्यावतीने काही ठिकाणी ड्रेनेजलाईन टाकलेली असून काही भाग सोडून दिला आहे.
या वसाहतीत काही नागरिकांनी ड्रेनेजची जोडणी न करता गटार नाल्यात सांडपाणी सोडल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. गटार नाल्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

Leave a comment

0.0/5