Skip to content Skip to footer

लोणंदमधील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या वेळी लाखो वारकरी लोणंदमध्ये दाखल होत असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्यामार्फत भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध होणार आहेत. तसेच आपत्कालीन सेवेसाठी खासगी दवाखान्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे प्रसिद्धी करण्यात आली
आहे.

पालखी सोहळ्यात भाविकांना २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चार वैद्यकीय पथकामध्ये ३३ वैद्यकीय अधिकारी, १३ औषध निर्माण अधिकारी, १७ आरोग्य सहायक, २ आरोग्य सहायिका, ४२ आरोग्यसेवक, ३० आरोग्य सेविका, ८ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात लागणारा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी सातारा येथील जिल्हा प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर टीसीएलची तपासणीही करण्यात आली आहे. भाविकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १० ठिकाणी ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पालखी तळावर, प्राथमिक आरोग्य केंद्र व घाटावर प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.

खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. पालखी काळात शहरातील सर्व हॉटेल्स, फळविक्रेते, चहा व खाद्यपदार्थ विक्री करणाºया टपरीधारकांच्या तपासणीसाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. त्यांना पाणी तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. वरील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बागडे व त्यांचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०८ व १०२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित आहेत.
वारकºयांना लोणंदमध्ये आल्यानंतर आरोग्यविषयक गैरसोयीचा सामना करावा लागू नये. दूषित पाणी पिण्यास आल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती असते. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविली आहे.

वीज जोडणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
आषाढी वारीकरिता वीज वितरण विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात सर्व पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी वीज जोडणी देण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत तालुका स्तरावरील अधिकाºयांशी संपर्क साधावा. अधिकृतपणे वीज जोडणी घेऊन संभाव्य धोका टाळावा व हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5