पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा

Mumbai-rains

पावसाळ्यात मुंबई तुंबण्याची खरी कारणे नक्की वाचा

दरवर्षी मुंबईत प्रचंड पाऊस होतो आणि या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत होते. याचा दोष मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेला देण्याची प्रथा सुद्धा अजाणतेपणामुळे रूढ झाली आहे. मुंबईची तुंबई झाली असं म्हणत प्रत्येक पावसाळ्यात मुंबई महानगरपालिकेवर टीका केली जाते पण मुंबईवर ओढवणारी ही परिस्थिती महापालिकेमुळे नव्हे तर भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या, कचरा इत्यादी गोष्टींमुळे होते. मुंबईची तुंबई होण्यास कोणती कारणे आहेत आपण पाहूया:

१) प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत खोलगट भागात पाणी साचते. पावसामुळे मुंबईतील किंग्स सर्कल, हिंदमाता इत्यादी ठराविक परिसर पाण्याखाली जातात याला सर्वात महत्वाचं कारण आहे मुंबईची भौगोलिक परिस्थिती. मुंबईचा आकार हा बशीसारखा आहे. त्यामुळे मुंबई शहरात पावसामुळे आलेलं पाणी बाहेर वाहून जाण्यास वाव नाही.

२) मुंबई हे ७ बेटं एकमेकांना जोडून तयार झालेलं शहर आहे. शिवाय मुंबईत २२ टेकड्यांची रांग आहे.मुंबईतील सखल भागात लोकवस्ती वाढत जात असताना तिथे भराव घालण्यात आला. त्याआधी तो भाग दलदल आणि खाडीचा होता. त्यामुळे या भागात पाणी साचतं.

३) मुंबईला अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. नद्या, नाले इत्यादीतून वाहणारं पाणी समुद्राला जाऊन मिळतं हे आपण जाणतोच. पण जेंव्हा समुद्राला भरती येते तेंव्हा समुद्राचं पाणी शहराकडे येऊ लागतं. परिणामी शहरातून बाहेर जाणारं पाणीही पुन्हा शहरात घुसतं. समुद्रकिनारी असलेली खारफुटी ही भरतीच पाणी शहरात येण्यापासून रोखत असते, पण मानवाने मात्र ५०% पेक्षा जास्त खारफुटीची जंगलं तोडून नष्ट केली आहेत.

४) मुंबईत वाढत्या लोकसंख्येच्या बोजानुसार जागा अपुरी पडत होती तेंव्हा नद्या,नाले,समुद्रात भर टाकून जवळपास १५० चौरस किलोमीटर इतकी वाढ मुंबईच्या क्षेत्रफळात करण्यात आली. त्यामुळे राहण्याची व्यवस्था झाली पण पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था साफ कोलमडली.

५) मुंबईत असलेली अफाट लोकसंख्या पाहता मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची व्याप्ती लक्षात येईल. लाखो लोक आजही कचरा कचरापेटीत न फेकता इतरत्र फेकतात. हाच कचरा नद्या, नाले, गटारीमध्ये अडकून बसतो. परिणामी पाणी समुद्रात वाहून न जाता तुंबून राहतं.

६) मुंबई वाढत गेली पण त्याबरोबर पाणी वाहून नेण्यासाठी गटारी, नाले यांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे उपलब्ध गटारी आणि नाल्यांवर अतिरिक्त बोजा वाढला.

७) मुंबईच्या डोंगराळ भागामुळे मुंबईत जास्त पाऊस पडतो. साहजिकच डोंगरावरचं सगळं पाणी वेगाने उताराच्या दिशेने वाहत शहरात येऊन थांबतं.

८) अनियंत्रित पाऊस हे मुंबईची तुंबाई होण्याचं कारण आहे. सध्या जून महिनाभर दडी मारून बसलेला पाऊस हा मागील तीन दिवसात कोसळला. तीस दिवसात पडायला हवा होता तेवढा पाऊस केवळ तीन दिवसात पडल्याने साहजिकच यंत्रणा विस्कळीत होतात.

ही होती मुंबईची तुंबई होण्यामागची प्रमुख कारणं. आता जाणून घेऊया यावर महापालिकेने केलेले उपाय:

१) महापालिकेचे कर्मचारी रोज लाखो टन कचरा उचलून मुंबईची सफाई करतात. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम राबवली जाते.

२) प्लास्टिक कचऱ्यावर पाण्याचा परिणाम होत नाही आणि त्यामुळे पाणी तुंबतं हे लक्षात घेऊनच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

३) मुंबईत दरवर्षी होणारा प्रचंड पाऊस आणि त्यामुळे सखल भागात साचणारे पाणी लक्षात घेऊन मुंबईतील प्रमुख भागात प्रत्येक सेकंदाला लाखो लिटर पाणी उपसून बाहेर फेकणारी पंपिंग स्टेशन्स मुंबई महानगरपालिकेने उभी केली आहेत. परंतु या पंपिंग स्टेशन्समध्ये पावसाच्या पाण्यासोबत वाहून आलेले दगड आणि कचरा अडकून बसतो. परिणामी या पंपिंग स्टेशन्सच्या कार्यात अडथळे येतात व पाणी बाहेर फेकण्याचा वेग कमी होतो. पावसाचा वेग ओसरताच मात्र काही तासात हे पाणी उपसून परिस्थिती पूर्ववत केली जाते.

४) २६ जुलै २००५ नंतर मुंबई महापालिकेने केलेल्या कामांमुळेच तेंव्हासारखी मुंबई बुडण्याची परिस्थिती आज ओढवत नाही. मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस हे दिवसरात्र मुंबई सुरळीत ठेवण्यासाठी राबत असतात.

५) मुंबईत महापालिका एकटीच कार्यरत नाही तर रेल्वे, MMRDA, पोस्ट, पोर्ट ट्रस्ट, MSRDC अशा अनेक यंत्रणा मुंबईत एकत्र कार्यरत असतात. त्यामुळे मुंबई महापालिका एकटीच मुंबई तुंबण्याला जबाबदार धरली जाऊ शकत नाही. रेल्वे स्टेशन्स अथवा रुळांवर पाणी साचलं तर त्याचा निचरा करण्याचा अधिकार पालिकेला नसून तो रेल्वेला आहे.

प्रचंड पावसात मुंबई तुंबली म्हणून टीका टिप्पणी करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकांनी कचरा कचरापेटीतच फेकण्याची शपथ घेतली तरी मुंबईची तुंबई होण्याचे प्रमाण निम्म्यावर येईल.

आजपासून चार दिवस पावसाचे; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण बरसला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here