Skip to content Skip to footer

सोलापूर भाजप महापौरांसह दिग्गज शिवसेनेच्या वाटेवर?

सोलापूर भाजप महापौरांसह दिग्गज शिवसेनेच्या वाटेवर?

आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होणार आहे. लोकसभेत शिवसेना भाजपची युती झाली आणि युतीला प्रचंड यश मिळालं हे पाहून आमदारकीचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या मनात धडकी भरली. साहजिकच आघाडीत राहून आपल्या राजकीय भविष्याची बिघाडी करून घेण्यापेक्षा हे नेते युतीचं दार ठोठावण पसंत करताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीतच अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजपवासी झाले होते तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. यांत सोलापूरच्या भाजप महापौर शोभा बनशेट्टी, माजी काँग्रेस आमदार दिलीप माने, काँग्रेस आमदार भारत भालके, भाजप नेते लक्ष्मण ढोबळे,राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदे, दिलीप सोपल, इत्यादी बड्या नेत्यांचा समावेश आहे.

सोलापूर भाजपमध्ये पालकमंत्री गट आणि सहकारमंत्री गट अशी उभी फूट पडलेली आहे. यातील सुभाष देशमुख गटाचा विजयकुमार देशमुख यांना विरोध आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखांचा सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. स्वतः देशमुख या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले आहेत. असं असतानाही त्यांच्याबद्दल भाजपमध्ये असलेल्या नाराजीमुळे अनेक नेते येथून देशमुखांच्या ऐवजी आमदार होण्याचे स्वप्न बाळगून आहेत. भाजप महापौर शोभा बनशेट्टी यांनी आमदार व्हावे अशी लिंगायत समाजातील लोकांची तसेच काही भाजप नेत्यांची इच्छा आहे. परंतु भाजपचे शहरातील दोन आमदार मंत्री असल्याने आणि शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी शोभा बनशेट्टी शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं समजतं.

दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून आमदार होण्याची इच्छा आहे. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सहकारमंत्री सुभाष देशमुख करतात, पण ही जागा पूर्वी शिवसेनेकडे होती. असं असलं तरी युतीच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदार आणि मंत्री असल्याने हा मतदारसंघ सुभाष देशमुखांकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे माने शिवसेनेत प्रवेश करून शहर मध्य मधून नशीब आजमावण्याचा प्रयत्नात आहेत. पंढरपूरचे आमदार भारत भालके, बार्शीचे राजेंद्र राऊत हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नसल्याने भालके तर बार्शी मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने राऊत शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं समजतं.

लक्ष्मण ढोबळे हेही आघाडी सरकार काळात सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु भाजपमध्ये राहून फारसा फायदा नसल्याने ते पर्यायाच्या शोधात आहेत. तर मोहोळचे क्षीरसागर, अक्कलकोटचे संजय पाटील आदी नेतेही शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी काळात सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला सुगीचे दिवस येण्याची चिन्हं आहेत.

 

२५ वर्षांपासून रखडलेला सिंचन प्रकल्प आदित्य ठाकरेंनी लावला मार्गी

Leave a comment

0.0/5