पालघर येथील जव्हार तालुक्यात झालेल्या दुर्दैवी प्रकरणात वाचलेल्या तीन अनाथ मुलींचं पालकत्व शिवसेनेने घेतलं आहे. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या मुलींची भेट घेत हा निर्णय जाहीर केला. याबाबत अधिक माहिती अशी की येथील एका वीटभट्टी कामगाराने आर्थिक विवंचनेला कंटाळून जून महिन्यात आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात चार मुली आणि पत्नी असा परिवार होता. या मुलींच्या आईने पतीच्या निधनानंतर बाराव्या दिवशी विषप्राशन केलं. सोबतच आपल्या अडीच वर्षे आणि नऊ महिने वयाच्या दोन मुलींना सुद्धा विष पाजलं. यात अडीच वर्षीय मुलीचा आणि त्या महिलेचा मृत्यू झाला. केवळ नऊ महिन्याची मुलगी विष पाजलं जाऊनही जिवंत राहिली तर उर्वरित दोन मुली शाळेत गेलेल्या असल्याने त्यांना विष पाजलं नव्हतं. शाळेत गेलेल्या या मुलींना शाळेने लवकर घरी सोडलं नाही म्हणून त्या वाचल्या.
आई-वडील आणि एका बहिणीच्या निधनानंतर तीन मुलींना कोणी वाली उरला नव्हता. यापैकी विष पाजलं जाऊनही बचावलेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेला शिवसेनेच्या वतीने रूग्णालयात सर्वोत्तम उपचार मिळतील याची दक्षता घेण्यात आली. तसेच शिवसेनेने या अनाथ मुलींचं पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेनेने या तीन मुलींच्या नावाने प्रत्येकी एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट बँकेत जमा केले आहे. त्यांच्या संगोपनासाठी दरमहा ५ हजार रुपये शिवसेना देणार आहे. या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेना घेणार आहे. एवढंच नव्हे तर या मुलींना आपलं हक्काचं घर सुद्धा शिवसेना बांधून देणार आहे.
या दुर्दैवी प्रकरणात आपल्या डोक्यावरील मायेचं छत्र गमावलेल्या या मुलींची एकनाथ शिंदेंनी भेट घेत त्यांना मायेचं छत्र अर्पण केलं. भेटीस आलेल्या शिंदेंनी लहानग्यांसाठी “टेडी बिअर” आणल्याने त्यांच्या प्रेमळ आणि हळव्या स्वभावाचं उपस्थितांना दर्शन झालं. पालन-पोषण, शिक्षण आणि निवारा या सर्वच गोष्टींची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याने या मुलींचं भविष्य सुरक्षित झालं आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी शिवसेनेचं कौतुक केलं आहे.
दिलीप मोहितेंच्या कारवाईमागे माझा आणि आढळरावांचा अजिबात हात नाही – गोरे