Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंचा झंझावाती जन आशीर्वाद दौरा जाहीर

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा बहुचर्चित जन आशीर्वाद दौरा अखेर जाहीर झाला आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्याचा पहिला टप्पा १८ जुलैपासून सुरु होणार आहे. जळगाव येथून सुरु झालेल्या या दौऱ्यात आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम घेणार आहेत. अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी दिली. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत” हे या दौऱ्याचं मुख्य उद्दिष्ट आहे असं त्यांनी जाहीर केलं.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधावा यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे. या दौऱ्याचा पहिला टप्पा १८ ते २२ जुलैदरम्यान पार पडणार आहे असं सरदेसाई म्हणाले. उत्तर महाराष्ट्राकडून शिवसेनेला येत्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठं यश अपेक्षित आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बैठकीत या दौऱ्याची सुरुवात जळगावमधून करण्याचा निर्णय घेतला गेला असं त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी, शिवसेना नेते, उपनेते,आमदार, खासदार आणि इतर पदाधिकारी असतील. आदित्य संवाद, कार्यकर्ता मेळावे, प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी, जाहीर सभा इत्यादी कार्यक्रम या दौऱ्यादरम्यान घेतले जातील आणि संपूर्ण जिल्हा व तालुके पिंजून काढले जाणार आहेत. या दौऱ्याचा दुसरा टप्पाही लवकरच जाहीर केला जाईल असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आलं. यावरून शिवसेनेने या माध्यमातून विधानसभेची जय्यत तयारी सुरु केली आहे असं दिसतं.

असा असेल आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद दौऱ्याच्या पहिला टप्पा:

१८ जुलै: जळगाव येथून दौऱ्याचा शुभारंभ
१९ जुलै: धुळे जिल्हा व मालेगाव
२० जुलै: नाशिक शहर व नाशिक लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ
२१ जुलै: नाशिक ग्रामीण व नगर
२२ जुलै: नगर जिल्यातील श्रीरामपूर व शिर्डी लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ

आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा इतिहास घडवणार?

Leave a comment

0.0/5