वीकेंडला प्रवासासाठी मुंबईकरांची बेस्टला पसंती.

बेस्ट । Mumbai's best choice for travel to Weekend

बेस्टचे तिकीट दर कमी झाल्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनी प्रवासासाठी पहिली पसंती बेस्टला दिलेली आहे. त्यामुळे तिकीट कपातीचा बेस्टने घेतलेला निर्णय योग्यच ठरलेला आहे असेच चित्र आज दिसून येते. रविवार १४ जुलै रोजी बेस्टची १४ लाख ६३ हजार ८२१ तिकीट विक्री झाली आहे. म्हणजे प्रत्येक तिकिटामागे एक प्रवाशी असे गृहीत धरता किमान एवढय़ा संख्येने रविवार असूनही मुंबईकरांनी बेस्टला पसंती दिली आहे. तिकीटदर कमी होण्यापूर्वी म्हणजेच ७ जुलैची आकडेवारी पाहता या वेळी रविवारच्या प्रवाशी संख्येत ४ लाख ८४ हजार ६४६ भर पडली आहे.

बेस्टने साध्या बसचे किमान तिकीट दर पाच तर एसी बसचे किमान तिकीट सहा रूपये केल्यानंतर ९ जुलैपासून प्रवाशांनी पुन्हा बेस्टकडे आपली पावले वळविली आहेत. त्यामुळे प्रवाशी संख्या सात लाखांपर्यंत वाढत गेली. उत्पन्न मात्र दोन कोटीहून कमी होत गेले. तसेच पासधारकांची संख्याही वाढल्याचे समोर आले. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत बहुतांश सरकारी कंपन्या व खासगी कंपन्यांच्या कार्यालयांना सुट्टी असते. त्यातच अनेक छोटे-मोठे उद्योग व्यवसायही बंद असतात. त्यामुळे विकेण्डचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर बाहेर पडतात.

रविवार ७ जुलै रोजी ९ लाख ७९ हजार १७५ प्रवाशांनी बेस्ट बसगाडय़ांमधून प्रवास केला होता. स्वस्त प्रवास झाल्यानंतर १४ जुलै रोजी प्रवाशांची हीच संख्या १४ लाख ६३ हजार ८२१ पर्यंत पोहोचली आहे. तुलनेने बेस्टचे उत्पन्न मात्र कमी झाले आहे. रविवार ७ जुलै रोजी १ कोटी ३७ लाख १८ हजार २५ रुपये उत्पन्न मिळाले होते. गेल्या रविवारी हेच उत्पन्न १ कोटी ५ लाख ७४ हजार ४८० रुपये झाल्याचे बेस्टने जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here