Skip to content Skip to footer

गुरुपौर्णिमा:शिवसैनिकांची शिवतीर्थ आणि मातोश्रीवर रीघ

आज गुरुपौर्णिमा. यानिमित्ताने आज प्रत्येकजण आपल्या गुरूला विविध माध्यमातून वंदन करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी “मातोश्री” वर शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांची रीघ लागलेली आहे. तसेच शिवतीर्थ म्हणजेच शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर आपला माथा टेकवून शिवसेनाप्रमुखांना गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर वंदन करण्यासाठी सकाळपासूनच शिवसैनिकांनी हजेरी लावली आहे. बाळासाहेब असताना गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय मातोश्रीवर दाखल होत असे. तीच परंपरा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. मातोश्री येथील बाळासाहेबांच्या सिंहासनाचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक महाराष्ट्रभरातून मुंबईत आले आहेत.

बाळासाहेबांना सोनचाफ्याची फुले/हार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सोनचाफ्याची फुलं अत्यंत प्रिय होती. हे ध्यानी ठेऊन शिवसैनिकांनी आपल्या गुरुसाठी सोनचाफ्याची फुलं आणि हार आणत ते शिवसेनाप्रमुखांच्या सिंहासनावरील तसबिरीस अर्पण केले. अनेकांनी गुरुदक्षिणा स्वरूपात देणगी दिली.

विधानसभेवर भगवा हीच गुरुदक्षिणा

आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकावून बाळासाहेबांचं स्वप्नं पूर्ण करू हीच आमची बाळासाहेबांना गुरुदक्षिणा असेल असा संकल्प शिवसैनिकांनी आज गुरुपौर्णिमा हे औचित्य साधून केला आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी “विधानसभेवर भगवा हीच गुरुदक्षिणा” असे पोस्टर्स बाळासाहेबांच्या छायाचित्रासहित पोस्ट केले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त १ लाख झाडे लावणार-चंद्रकांत खैरे

Leave a comment

0.0/5