Skip to content Skip to footer

शिवसेनेचा पीक विमा मोर्चा सरकारविरोधात नाही,तो कशासाठी आहे वाचा:

आज शिवसेनेचा मुंबईतील बीकेसी येथे शेतकरी पीक विमा मोर्चा निघतोय. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या धडक मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. मोर्चानंतर त्यांची सभा सुद्धा होणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. तरीही शिवसेनेचा सरकारविरोधात मोर्चा का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेनेचा हा मोर्चा सरकारविरोधी नसून तो पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने शिवसेनेने राज्यभरातील ग्रामीण भागात पीक विमा मदत केंद्रं उभारली होती. यात राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विमा भरूनही नुकसानभरपाई देण्यास या कंपन्या टाळाटाळ करत आहेत. एकट्या संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. सरकारकडून पीक विमा कंपन्यांना रक्कम पाठवली जाऊनही या कंपन्या तो पैसा स्वतःजवळ ठेवतात तो शेतकऱ्यांना मिळत नाही याविरुद्ध शिवसेनेचा हा मोर्चा आहे.

शिवसेनेचा मोर्चा नेमका कशासाठी आहे हे जाणून घ्या:

१) दुष्काळ, अतिवृष्टी इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही. उलट शेतकऱ्याने पिकासाठी खर्च केलेला पैसा वाया जातो आणि शेतकरी कर्जबाजारी होतो.

२) शेतकऱ्यांचं हे नुकसान टाळण्यासाठी पीक विमा उतरवला जातो. शेतकरी पीक विम्याचे अर्ज आणि रक्कम विमा कंपन्यांकडे जमा करतात.

३) सरकार नुकसान झाल्याची पाहणी आणि पंचनामा करून पिकाची नुकसानभरपाई या कंपन्यांकडे पाठवून देतं

४) परंतु या पीक विमा कंपन्या तो पैसा शेतकऱ्यांना देत नाहीत. या ना त्या कारणावरून शेतकऱ्यांची अडवणूक करून हा पैसा स्वतःकडेच ठेवणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात हा शिवसेनेचा मोर्चा आहे.

५) सरकारने नुकसानभरपाईचा पैसा पीक विमा कंपन्यांकडे दिलेला असल्याने सरकारविरोधात मोर्चा असण्याचं काही कारण नाही.

सामान्य माणूस जेंव्हा आरोग्य विमा किंवा वाहनाचा अपघात विमा काढतो तेंव्हा अपघात झाल्यास अनेकवेळा विमा रक्कम मिळत नाही. सर्व निकष पूर्ण केलेले असूनही ग्राहकाला नुकसानभरपाई दिली जात नाही. अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांना इशारा देण्यासाठी शिवसेनेचा हा मोर्चा आहे. राज्यभरातील दुष्काळग्रस्त गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना हा मोर्चा काढत आहे.

शेतकरी पीक विमा प्रश्नावर शिवसेना आक्रमक

Leave a comment

0.0/5