अविश्वसनीय:मोदी लाट असतानाही स्वतःचा पक्ष वाढवणारे उद्धव ठाकरे!

उद्धव ठाकरे

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक अविश्वसनीय गोष्ट करून दाखवली आहे. ती म्हणजे मोदींची प्रचंड लाट शिवसेनेची ताकद आणि संख्याबळ दोन्ही वाढवणं. भाजप आणि मोदींच्या त्सुनामी लाटेचा सामना करताना देशात काँग्रेस भुईसपाट झाली. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले अक्षरशः उध्वस्त झाले पण शिवसेनेचे बालेकिल्ले मात्र मोदी लाटेत सुद्धा अभेद्य राहिले. शिवाय शिवसेनेची सत्ता नसल्या ठिकाणीही शिवसेनेच्या जागा वाढल्या. उद्धव ठाकरेंच्या चाणाक्ष राजकारणाने युती करून असो अथवा स्वबळावर, नगरपालिका असो वा लोकसभा शिवसेनेचं संख्याबळ हे वाढतच राहिलं आहे. याचाच लेखाजोखा घेणारा हा लेख:

२०१४ लोकसभा: २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये लढली. शिवसेनेला २० पैकी १८ जागांवर अभुतपुर्व यश मिळालं. शिवसेनेच्या इतिहासात सर्वाधिक खासदार लोकसभेत गेले.

२०१४ विधानसभा: लोकसभेत मोदी लाटेमुळे बहुमत मिळालेल्या भाजपने स्वबळाचा नारा देत विधानसभा निवडणुकीत युती तोडली. महायुतीतील मित्रपक्ष भाजपसोबत गेले आणि शिवसेना एकाकी लढली. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपला स्वबळावर सत्तेत येण्यापासून रोखलं. शिवसेनेचे स्वबळावर ६३ आमदार विजयी झाले तेही मोदी लाटेचा विरोधात. ६३ आमदार हा शिवसेनेचा दुसरा सर्वाधिक आमदारांचा आकडा आहे परंतु सर्वाधिक ७२ आमदार आले होते तेंव्हा युती होती. याचा अर्थ एकट्याने लढून ६३ जागा हा शिवसेनेचा विधानसभेतील सर्वोत्तम परफॉर्मन्स म्हणावा लागेल.

कल्याण-डोंबिवली महापालिका: कल्याण – डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढवली. तरीही शिवसेनेने आधीपेक्षा जवळपास दुप्पट जागांवर विजय मिळवला.

नवी मुंबई व संभाजीनगर महापालिका: या निवडणुकीत शिवसेनेची स्वबळावर लढल्यास नवी मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता आली असती. परंतु संभाजीनगर पालिकेत एमआयएमला फायदा होऊ नये म्हणून शिवसेनेने भाजपसोबत युती केली. संभाजीनगर पालिकेत शिवसेनेची सत्ता कायम राहिली तर नवी मुंबई पालिकेत शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालं. शिवसेनेच्या जागांमध्ये प्रचंड वाढ झाली.

२०१७ महापालिका निवडणुका: २०१७ मध्ये राज्यातील अत्यंत महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या. यावेळी भाजपकडून ऐनवेळी युती तोडली जाईल हे हेरून उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

यापैकी मुंबई महापालिकेत शिवसेनेची भाजपसोबत काट्याची टक्कर झाली. शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ झाली पण भाजपनेही शिवसेनेच्या जवळ जाणाऱ्या जागा मिळवल्या. पण उद्धव ठाकरे यांनी राजकीय डावपेच योग्यरीत्या खेळत मुंबईवर शिवसेनेचाच महापौर आणि उपमहापौर बसवला.

ठाण्यात शिवसेनेचे स्वबळावर सत्ता आली. शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर अबाधित राहिला. नाशिक, पुणे आणि सोलापूर या महापालिकांमध्ये शिवसेनेचं संख्याबळ आधीपेक्षा चांगलच वाढलं.

नगर महानगरपालिका: स्वबळावर लढूनही नगर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीला हाताशी धरून बाजी मारली.

नगरपालिका निवडणुका: बदलापूर व अंबरनाथ या नगरपालिका शिवसेनेने स्वबळावर जिंकल्या.एकूण नगरपालिका निवडणुकांत सुद्धा शिवसेनेचे भाजप नंतर सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले.

२०१९ लोकसभा: शिवसेनेने भाजपसोबत युती करून आपला १८ खासदारांचा आकडा कायम राखला.

महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात भाजप वाढत असतानाच शिवसेनाही वाढली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, सोलापूर, असे बालेकिल्ले उध्वस्त झाले मात्र शिवसेनेचे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, संभाजीनगर हे बालेकिल्ले अबाधित राहिले. याच श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला द्यावं लागेल.

एकूणच सत्तेत राहून सरकारच्या अनेक निर्णयांवर विरोधी भूमिका घेणारे म्हणून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका झाली असली तरी जनतेने मात्र शिवसेनेची ही भूमिका स्वीकारली असून याचा शिवसेनेला फायदाच झाला आहे असं यावरून स्पष्ट होतं.

उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या गोष्टी वाचून आपण थक्क व्हाल!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here