पक्षांतरावरून भाजपवर टीका करण्याच्या नादात राष्ट्रवादीचा पचका

राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या पक्षांतराचे धक्के बसत आहेत. जवळपास २० राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना-भाजपचा रस्ता धरला आहे. यात मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. चित्रा वाघ यांचा प्रवेश अद्याप झालेला नाही मात्र त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे.

गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्व नगरसेवकांसह भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना शरद पवारांनी चित्रा वाघ यांनी पतीला चौकशीतून वाचवण्यासाठी भाजपचा रस्ता धरल्याचं म्हटलं होतं. हसन मुश्रीफांच्या घरावर धाड पडल्यानंतर सुद्धा भाजपप्रवेश न केल्याने कारवाई झाल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं होतं. तर अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर भाजपमध्ये न आल्यास भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढू असं ब्लॅकमेलिंग करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपत प्रवेश करण्यास भाग पाडल्याचं म्हटलं होतं. यालाच धरून राष्ट्रवादीने फेसबुक पेजवरून भाजप आणि फडणवीसांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न राष्ट्रवादीवरच उलटला. त्यांच्यावर पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली.

याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पेजवर पक्षांतरावर भाष्य करणारं एक व्यंगचित्र पोस्ट केलं होतं. ज्यात मुख्यमंत्री एका नेत्याला भाजपात प्रवेश न केल्यास भ्रष्टाचाराची फाईल काढण्याची धमकी देत आहेत असं दाखवून भाजपला टोला लागवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केले आहेत असाही या व्यंगचित्राचा अर्थ होतो. अन्यथा त्यांच्या नेत्यांना भ्रष्टाचाराची फाईल बाहेर निघण्याची भीती वाटलीच नसती. हाच धागा पकडून नेटकऱ्यांनी राष्ट्रवादीच्या या पोस्टवर कमेंट्सचा भडीमार केला. “तुम्ही एवढे भ्रष्टाचार केलेच नसते तर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करू शकलं नसतं”, “तुम्ही भ्रष्टाचार करायचाच कशाला?”, “म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी असल्याची कबुली देत आहात तर” अशा एक ना अनेक तिखट प्रतिक्रिया या पोस्टवर येऊ लागल्या.

हे व्यंगचित्र आपल्यावर उलटलं असल्याचं लक्षात येताच ते पेजवरून हटवण्यात आलं. एकूणच भाजपवर टीका करण्याच्या नादात राष्ट्रवादीची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here