शिवसेनेत इनकमिंग सुरूच, हे बडे नेते मार्गावर?

शिवसेनेत इनकमिंग सुरूच
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला फुटीचं ग्रहण लागलं आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते शिवसेना-भाजपच्या गोटात सामील होत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत जयदत्त क्षीरसागर, शेखर गोरे, पांडुरंग बरोरा, दिलीप सोपल, रश्मी बागल, सचिन अहिर या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा प्रवेश झाला आहे. यासोबतच काँग्रेसचे दिलीप माने,निर्मला गावित, बविआ आमदार विलास तरे, भाजपचे नागनाथ क्षीरसागर इत्यादी नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शिवसेनेत सुरु असलेलं हे इनकमिंग आणखी काही दिवस सुरूच राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बडे नेते शिवसेनेच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. यामुळे आगामी विधानसभेपूर्वी शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.
शिवसेनेच्या वाटेवर असलेले नेते नेमके कोण आहेत यावर एक नजर:
अवधूत तटकरे: राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे अवधूत तटकरे हे पुतणे आहेत. अवधूत तटकरे स्वतः राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
रामराजे निंबाळकर: उदयनराजे आणि रामराजे यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. पण या दोघांतून विस्तव जात नाही. त्यामुळे उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केल्यास रामराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करू शकतात.
भास्कर जाधव: राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या भास्कर जाधवांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आपण लवकरच पक्षांतर करणार असून भाजपात प्रवेश करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित आहे.
छगन भुजबळ: शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या नेत्यांमध्ये सर्वात मोठं नाव छगन भुजबळांचं आहे. परंतु हा प्रवेश अद्याप निश्चित नाही. छगन भुजबळ तब्बल सात ते आठ आमदारांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. असं झाल्याचं शिवसेनेला ओबीसींची मोठी ताकद मिळू शकते.
दीपक साळुंखे: सोलापूर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंखे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबद्दल जयंत पाटील यांनीही शिवस्वराज्य यात्रेत बोलताना भाष्य केलं होतं.
महेश थोबडे: महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवणारे महेश थोबडे शिवसेना-भाजप युती तुटल्यास सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना शिवसेनेतून आव्हान देणार असल्याची चर्चा आहे.
विनोद पाटील: मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख नेते असलेले विनोद पाटील यांनी आरक्षण कोर्टात कायम राहताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आभार मानले होते. कालच त्यांची आदित्य ठाकरे यांच्यासोबत भेट आणि चर्चा झाली आहे. आगामी काळात ते शिवसेनेचा भगवा हाती घेऊ शकतात.

या नेत्यांशिवाय अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात शिवसेना प्रवेश केल्याचं पाहायला मिळू शकतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here