विश्वकोश कार्यालय वाईतून हलविण्याचा विचारही नाही – देसाई

विश्वकोश-कार्यालय-वाईतून-From the Encyclopedia Office

विश्वकोश कार्यालय वाईतून हलविण्याचा विचारही नाही – देसाई

मराठी विश्वकोश कार्यालय वाईतून हलविले जाण्याबाबत चुकीच्या बातम्या पसरविल्या जात असून अशाप्रकारचा आम्ही कुणी विचारही करू शकत नसल्याचे सांगत मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी आज या अफवांना पूर्णविराम दिला. वाई येथील मराठी विश्वकोशाचे कार्यालय पुणे अथवा मुंबईला हलविण्याचा विचार मराठी भाषा विभागाकडून सुरू असल्याच्या चुकीच्या बातम्या गेले काही दिवस समाजमाध्यमांवर पसरवल्या जात होत्या. या खोडसाळपणामुळे समाजात कारण नसताना चुकीचा संदेश जात वाईमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. परंतु यावर संबंधित मंडळांच्या सचिवांनी तातडीने खुलासा करत हा खोडसाळपणाचा प्रकार असल्याचे जाहीर केले होते. आज यावर संबंधित विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनीही स्पष्टीकरण देत या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

या अफवांच्या निमित्ताने सत्य परिस्थिती काय आहे, शासनाचे नेमके धोरण काय आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी देसाई यांची नागपूर येथे भेट घेतली. तसेच सध्या वाईत या विषयावर सुरू असलेली चर्चा त्यांच्या कानावर घातली. यावर देसाई यांनी ही चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रकार अत्यंत खोडसाळ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की विश्वकोश आणि वाईचे नाते आहे. अशाप्रकारे या गावातून हे कार्यालय हलवण्याचा आम्ही कुणी विचारही करू शकत नाही.

काय म्हणाले मंत्री देसाई,
   मराठी भाषा प्रगल्भतेसाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाई येथे विश्वकोश खंडाचे काम १९६० साली सुरू झाले. विश्वकोशाचे काम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे काम कधीही पूर्ण होऊ शकत नाही. विश्वकोशाच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम मराठी भाषेत राबविण्यात येत आहेत. आता तर विश्वकोश दररोज अद्ययावत होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here