Skip to content Skip to footer

शिवभोजन थाळीचा शुभारंभ.वाचा,तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या शहरात मिळणार ही थाळी.

काल २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘शिवभोजन’ थाळीचा राज्यात अनेक ठिकाणी दणक्यात शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, बुलडाणा, सोलापूर, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद यांसह अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. प्रत्त्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई उपनगरात महसूल कर्मचारी उपहारगृहामध्ये नागरिकांसाठी ‘शिवभोजन’ थाळीच्या योजनेचे उद्धाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पर्यावरण तथा पर्यटनमंत्री युवासेना प्रमुख आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही योजना सुरु करण्यात आली. यामुळे आता मुंबई उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत सकस आहार मिळणार आहे.
या योजनेच्या उद्घाटनाविषयी बोलतांना “पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळायला हवा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे” असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील मनीषा नगरमध्ये नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले. यावेळी त्यांनीही स्वतः या शिवभोजन थाळीचा स्वाद घेतला. महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू जनतेला माफक दरात म्हणजेच फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुणे :-
पुण्यात देखील शिवभोजन योजनेचा ठिकठिकाणी शुभारंभ करण्यात आला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा शुभारंभ केला. पुण्यातील सामान्य माणसाला १० रूपयांत पोटभर जेवणासाठी ही योजना सुरु करण्यात आली. पुण्यात दर दिवसाला १०० ते १५० थाळी देण्यात येतील. यावेळी काही त्रुटी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करु असे अजित पवार म्हणाले.
पुण्यात शिवभोजन थाळीचे उद्धाटन झाल्यानंतर काही मिनिटांतच जेवणासाठी नागरिकांनी मोठी रांग लावली. शिवभोजन योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
तर तिकडे नाशिकमध्ये एकुण ४ ठिकाणी ही शिवभोजन थाळी चालू करण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या शिवभोजन केंद्रांचे उद्धाटन करण्यात आले. प्रत्येक केंद्रात एका दिवसात १५० म्हणजेच एकुण ६०० गरजूंना हे भोजन मिळेल.
मराठवाड्यात बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांना १० रुपयांत पौष्टीक जेवणाचा गोरगरीब जनेला पोटभर जेवण मिळणार आहे.
सोलापुरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिव भोजनालयाचे उद्घाटन केले. सोलापूरच्या बस स्थानकात शिव भोजन योजना सुरु करण्यात आली. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी हे शिव भोजनालय असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या महत्त्वकांक्षी शिव भोजनालय योजनेचे उद्घाटन वाशिममध्ये करण्यात आले. वाशिमचे पालकमंत्री शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्धाटन करण्यात आलं. पालकमंत्री देसाई यांनी स्वतः लाभार्थ्यांना थाळी वाटप करून सर्वांचे मने जिंकली.
विदर्भात वाशिम मधील रेल्वे स्थानक परिसरात १२५ थाळीचे शिवभोजनालय सुरु करण्यात आलं असुन १५० थाळीचे जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आले आहे. याचा गोरगरीब जनतेला फायदा होईल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.
तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी सांगलीमध्ये हे शिव भोजनालय सुरु करण्यात आलं आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना अवघ्या १० रुपयात थाळी मिळणार आहे.
विदर्भात वर्धा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील या योजनेला शुभारंभ करण्यात आलं आहे. वर्धा रेल्वे स्थनाकासमोर १० रुपयांत गरजूना जेवण मिळणार आहे. शहराच्या दोन्ही शिवभोजनालयात सुरूवातीला दररोज १०० लोकांना याचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यात कुठलाही गरीब व्यक्ती उपाशी झोपता कामा नये या उद्देशाने ठाकरे सरकार कडुन ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे राज्य सरकारचा गोरगरिबांसाठी असलेला  एक प्रेमाचा ओलावा असल्याचं मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे.
१० रूपयात भरपेट जेवण या शिवभोजन थाळीचा शुभारंभ दणक्यात झाला असुन पहिल्या दिवशी अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

Leave a comment

0.0/5