चिंताजनक परिस्थिती – मुंबई आढळले नवे १६ कोरोना रुग्ण.
सध्या देशात आणि राज्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. आज राज्य आणि देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता मुंबईच्या उपनगरांमध्ये सोमवारी कोरोनाचे १६ नवे रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
या १६ पैकी १० जणांना निकट संपर्कातून कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. मुंबईकरांनी सतर्कता बाळगून घरातच राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे. सोमवारी कस्तुरबा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभा आणि खासगी रुग्णालयांच्या एकत्रित अहवालानुसार, मुंबईत १६ कोरोना रुग्णांचे निदान झाले. रविवारी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या ४१८ प्रवाशांची विलगीकरणात रवानगी करण्यात आली आहे.