देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोनच दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्याच वेळी प्रत्येक राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शहरे पूर्वपदावर आणण्यावर एकमताने चर्चा झाली होती. त्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.