आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही ! – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाच्या मुद्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला. ‘मी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरजी यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही’, असे सांगत आदित्य ठाकरेंनी हा विरोध केला आहे.
‘यापूर्वी दोन वेळा, एकदा १९९९ आणि नंतर २०११ च्या दरम्यान, मूल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. मग यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
पुढे बोलताना याबाबतीत ते म्हणाले, जवळपास १० वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री जयराम रमेशजी यांनी हा नाश थांबविला होता. त्यांनी त्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते आणि खाण साइट योग्य नाही असे अहवालात सूचित केले होते. यानंतर आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना या भागाचे पुन्हा संरक्षण करावे, अशी मागणी केली आहे. याबाबतीत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.