कोरोनाच्या विरोधात सुरु असलेला लढा आता घराघरात पोहोचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. काल वर्षा येथून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून संवाद साधला.
राज्यातील जिल्ह्यांतील पॉझिटिव्हीटी प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत, गेल्या 5 महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत.
आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच कोरोनाची वाढती संख्या पाहता कोरोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे सुद्धा मुकमंत्र्यांनी बोलून दाखविले.