कोरोनाच्या काळात मागील चार महिन्यांपासून बंद असलेल्या एसटीच्या प्रवासामुळे एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्याइतपत सुद्धा पैसा तिजोरीत शिल्लक नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ एसटीच्या प्रशासनावर आली होती. मात्र आता एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने चालवण्यास राज्य शासनाने परवानगी दिलीआहे
आजपासून या निर्णयाची सर्व आगारात अंमलबजावणी केली जाणार आहे. यावेळी प्रत्येकाने मास्क वापरणे आणि हात निर्जंतुक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. २० ऑगस्ट पासून राज्यभरात एसटी बसेस सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. केवळ ५० टक्के प्रवासी घेऊन जाण्याची अनुमती देण्यात आली होती.
मात्र एसटी महामंडळाकडे पूर्ण क्षमतेने चालवण्याची परवानगी मागितलेली होती. त्यानुसार राज्य शासनाने प्रत्येक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे, निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार, आज १८ सप्टेंबरपासून सर्व एसटी बसेस पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.