कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आलेला आहे. गणेशोत्सवानंतर मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र आज पक्ष प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी एकच गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सुद्धा परिस्थिती हाताळताना नाकीनऊ आले होते.
त्यामुळे शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी मध्यरात्रीपासून जमावबंदीचे कलम लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास तसेच एका ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे.
सध्या मनसेप्रवेशासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली आहे. याठिकाणी सर्वजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे आहेत. त्यामुळे आता कृष्णकुंजबाहेर जमलेल्या गर्दीवर पोलीस कारवाई करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.