आयुक्त तुकाराम मुंडे यांची काहीच दिवसांपूर्वी नागपूर मनपाच्या आयुक्त पदावरून मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. या निर्णयानंतर संपूर्ण नागपूरकरांनी विरोध दर्शवत तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याची मागणी सरकरकडे केली होती. त्यातच आता नागपूर जिल्हा शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंडे यांची पुन्हा नागपुर आयुक्तपदी बदली करण्याची मागणी केली आहे.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा नागपूरात बदली करावी यासंदर्भात शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. किशोर कुमेरिया त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. अनेक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाहीये. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा.” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.