येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याच प्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोनासंदर्भातील शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरुन आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
तसेच गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसे परिपत्रक शासनाने काढले होते त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल.