काँग्रेस नेते राहुल गांधी काल हाथरस येथे बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाले असताना त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी मधेच अडवले. त्यानंतर राहुल गांधी तिथेच धरणे देण्यासाठी बसले असता उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली तसेच लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला यावर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाष्य केले आहे.
ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राहुल गांधी खासदार आहेत सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसेच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत.