सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण चांगलेच पेटलेले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाची बाजू केंद्रात भक्कमपणे मांडणार अशी ग्वाही शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी मराठा संघटनांना दिला आहे.
शिवसेना खासदारांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला असुन त्यानिमित्ताने खासदार सदाशिव लोखंडे यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा तरुणांनी सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोखंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांचीच भावना आहे असे बोलून दाखविले होते.
खासदार लोखंडे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी यासाठी खंडपीठाकडे विनंती अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासन आरक्षण टिकावे यासाठी गंभीर असून शासन म्हणून सर्वतोपरी काळजी घेत प्रभावीपणे न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करीत आहे असे म्हटले होते.