माजी मंत्री एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला मुंबईत दाखल !
भाजपाचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबई दाखल झाले आहेत. त्यामुळे लवकरच एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात पक्षांतर करतील या चर्चेला उधाण आले आहे. मागील अनेक दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी खडसे सोडताना दिसले नाही.
त्यात त्यांनी फडणीसांवर उघड उघड आरोप लावण्यास सुरूवात केली होती. या आरोपाला फडणवीसांनीसुद्धा प्रतिउत्तर दिले होते. केंद्रीय सदस्य निवडणुकीत खडसेंना काही जबाबदारी मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तिथंही खडसेंच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळेच खडसेंनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून नाराज असणारे खडसे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. जळगावमध्ये राष्ट्रवादीची कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी खडसेंपुढे प्रस्ताव मांडणं हे राष्ट्रवादीच्या दृष्टीने फायद्याचे ठरु शकते ही बाबही तितकीच महत्त्वाची आहे.
दरम्यान ही भेट केव्हा होणार, या भेटीमध्ये कोण-कोण नेते सामील असणार याबाबत कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्या शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आपल्या यशवंतराव चव्हाण कार्यलयात पोहचलेले आहेत. तसेच एकनाथ खडसे आपल्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत अशी माहिती मिळत आहे.