राज ठाकरे त्यांनी फोन केल्यामुळे ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही! – मंत्री उदय सामंत
काही दिवसांपूर्वी ग्रंथालय सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रंथालयाचे शिष्टमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी राज्यातील ग्रंथालय सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने ग्रंथालय सुरु करण्यात आल्याचे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून संगणयत येत होते. यावर आता खुद्द मंत्री सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.
राज्यातील ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय तत्वतः आठ दिवसांपूर्वीच घेण्यात आला आहे. ही ग्रंथालय सुरू करतानाचे नियम येत्या दोन चार दिवसात तयार होईल. त्यानंतर राज्यातील ग्रंथालये सुरू होतील, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच ग्रंथालय सुरु करण्यासाठी कोणी कोणाला फोनाफोनी केली म्हणून ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असा टोलाही उदय सामंतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला.