बिहारमध्ये स्थानिक पक्षांना बरोबर घेऊन शिवसेना निवडणूक लढणार! – संजय राऊत
बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा शिसवेना ४० ते ५० उमेदवार उतरवणार आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह सुद्धा देण्यात आलेले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र यावर आता संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित लढण्याचा अद्याप कुठलाही विचार झालेला नाही. त्याऐवजी शिवसेना बिहारमधील स्थानिक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याला प्राधान्य देईल. बिहारचे अनेक स्थानिक पक्ष आमच्यासोबत निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मी लवकरच पाटण्याला जाणार आहे. त्यावेळी यासंदर्भात चर्चा केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
तसेच बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना निवडणूक लढवत आहे का? असा प्रश्नही राऊत यांना विचारण्यात आला. मात्र, बिहारमध्ये शिवसेनेची तेवढी ताकद नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. परंतु, शिवसेना ४० ते ५० जागांवर निवडणूक लढवेल, असे त्यांनी सांगितले.